लोकसभा निवडणुकीचं वार देशभर वाहतं आहे. अशात विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसतात. 2024 ला नरेंद्र मोदी सत्तेत आले तर ते देशाची राज्यघटना बदलतील, असा आरोप विरोधक करत असतात. यालाच भाजपच्या नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत बदल केला अन् नरेंद्र मोदींनी घटनेत दुरुस्ती केली आहे, असं चंद्रकात पाटील म्हणालेत.
मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत आज बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आणि मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बोलताना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतान चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं आहे.
सर्व पक्षांचा ताळमेळ जुळला आहे. एकजुटीने प्रचार केला तर आपले उमेदवार अधिक मताधिक्याने निवडून येतील. महायुतीची ही बैठक आहे. त्यामुळं आम्ही नेते मार्गदर्शन करूच. पण उपस्थितांपैकी कोणाला मुद्दे मांडायचे असतील तर मांडता येतील. मीडियामध्ये झळकण्यासाठी अनेक जण निगेटिव्ह बोलतात. त्यातून फारसं काही घडत नाही. त्यामुळं सकारात्मक बोला, भरपूर बोला… पण पॉझिटिव्ह बोला, अशी तंबी चंद्रकांत पाटलांनी युतीतील नेत्यांना अन् कार्यकर्त्यांना दिली आहे.
श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक होत आहे. या कार्यक्रमात उदय सामंत यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या निवडणुकीत किती मताधिक्य किती हा प्रश्न आहे. यात मतदारसंघात सहाही आमदार महायुतीचे आहेत. काही कामं झाली नाही.त त्याचा राग श्रीरंग बारणे यांच्यावर काढू नका. माझ्यावर तो राग व्यक्त करा, पण बारणे यांच्यासाठी काम करा, असं आवाहन सामंत यांनी महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना केलं.