बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांची महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही. म्हणून त्यांनी माझ्या वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. हे भाजपचं षडयंत्र आहे. हे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होत्या.
माझ्यासाठी ही कौटुंबिक लढाई नाही. ही एक वैचारिक लढाई आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे. अनेक दिवस झालं भाजप हा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेत आहेत. त्यांचे नेते म्हणत आहेत की, या निवडणुकीत शरद पवार यांना संपवायचं आहे. त्यांना विकास करायचा नाही. त्यांना शरद पवार यांना संपवायचं आहे. त्यांचे नेते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलले आहेत. त्यामुळे भाजपचा हा विचार खोडून काढला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये संपवायची भाषा भाजप करते. बारामतीत महायुतीकडून उमेदवारी ही माझ्या मोठ्या वहिनींना दिली आहे. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. अशी आमची संस्कृती आहे. आईच्या जागी माझ्या मोठ्या वहिनी आहेत. पण त्यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा विचार योग्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही. म्हणून त्यांनी वहिनींना उमेदवारी दिली. हे भाजप चे षड्यंत्र आहे. हे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे. मराठी माणसात भांडण लावायचं आणि स्वतः ची पोळी भाजून घ्या. दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला हा घात आहे. या विरोधात ही लढाई सुरु आहे. आमची वैचारिक लढाई ही भाजपने वैयक्तिक करून ठेवली आहे. पण इथे विजय हा सत्याचाच होणार आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.