पिंपरी : यावर्षीची अमरनाथ यात्रेत (Amarnath Yatra) ढगफुटी होऊन 14 जणांचा मृत्यू झाल्याने अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली, त्यातच आज पुन्हा एकदा अमरनाथ परिसरात पावसाची शक्यता असल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. या यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. यावर्षी अमरनाथ येथे ढगफुटी होऊन दुर्घटना घडली आहे, त्यानंतरही अमरनाथ गुहेजवळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यात्रा थांबवण्यात आली आहे. या यात्रेला पुण्यातीलही काही भाविक गेले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) शहरातील भाविक सुखरूप आहेत. मात्र, त्यातील एकाचा हृदयविकाराने मृत्यू (Heart Attack Death) झाला आहे. सुखरुप असलेले भाविक रविवारी परतीचा प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. गजानन महाराज खेडेकर यांच्यासोबत यात्रेकरू व इतर व्यवस्थापक मिळून 200 जण चार खासगी बसद्वारे अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. तसेच गजानन (अजय) महाराज सोनवणे यांच्यासोबत यात्रेकरून व इतर व्यवस्थापक असे 55 जण या यात्रेसाठी गेले आहेत.
दरम्यान, अमरनाथ येथे ढगफुटी होऊन पाण्याचा लोंढा भाविकांच्या लंगरमध्ये घुसला. त्यामुळे काही भाविक वाहून गेले. या दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाविकांचा संपर्क झाला नव्हता मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत सर्वच भाविकांचा संपर्क होऊन ते सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
तसेच गजानन महाराज खेडेकर यांच्यासोबत गेलेल्या भाविकांपैकी प्रदीप नाथा खराडे (रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांचा हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र शनिवरी पहाटे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णवाहिकेने खराडे यांचा मृतदेह पिंपरी-चिंचवड येथे आणण्यात येत आहे.