पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड, ‘त्या’ बनवेगिरीमुळे पद धोक्यात?

| Updated on: Jul 11, 2024 | 5:04 PM

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या बदलीनंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या बनवाबनवीचा आणखी एक कारनामा उघड झाल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड, त्या बनवेगिरीमुळे पद धोक्यात?
पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड
Follow us on

पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर या त्यांच्या आवाजवी मागण्यांमुळे आधी चर्चेत आल्या. त्या सध्या प्रोबेशन पिरिएडमध्ये कार्यरत आहेत. असं असताना त्यांनी लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. त्यांच्याविरोधात एका अधिकाऱ्याने कॅबिन बळकावल्याचीदेखील चर्चा आहे. असं असताना पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी २०२२ परीक्षेच्या वेळी आपण मल्टिपल डिसायबलिटीज असल्याचा दावा केला होता. पण वास्तव्यात तसं काही नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बनवेगिरीमुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे.

पूजा खेडकर या आयएएस कशा बनल्या? याबाबतचं गूढ वाढत चाललं आहे. २०१९ ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडेकर युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळे आयएएसचा दर्जा मिळू शकला नाही. मग २०२२ ला पूजा यांनी त्यासाठी शक्कल लढवायचं ठरवलं. आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत, असा दावा करत तसं सर्टिफिकेट त्यांनी युपीएससीला सादर केलं.

पूजा खेडकर यांनी घेतलेल्या आरक्षणावरून वाद

२०२२ ला झालेल्या युपीएससी परीक्षेत पूजा खेडकर यांना ८२१ वी रँक मिळाली. या रँकसह आयएएस दर्जा मिळणं शक्य नव्हतं. कारण त्यावर्षी ओबीसी क्याटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक ४३४ होती. म्हणजेच या विद्यार्थ्यांपेक्षा पूजा खेडकर यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आयएएस झाल्या. कारण त्यांनी त्यांना मल्टिपल डिसायबलिटीज असल्याचा दावा केला होता. मात्र त्याआधी २०१९ ला युपीएससीची परीक्षा देताना त्यांनी असा कुठलाही दावा केला नव्हता. विशेष म्हणजे कॅटने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकर यांची आयएएससाठी निवड झाली.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं स्वतःचं उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे ४० कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या? हा प्रश्न विचारला जातोय. खेडकर कुटुंबाच्या राजकीय लाग्याबांध्यांमध्ये या प्रश्नांची उत्तरं दडली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्यांच्या संपत्तीबाबत जी माहिती समोर आली आहे, त्याची आता चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते करत आहेत.

पूडा खेडकर वाशिममध्ये रुजू

पूजा खेडकर यांची पुण्यातून बदली झाल्यानंतर त्या आज वाशिममध्ये रुजू झाल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. तर आज रुजू झाली असून वाशिममध्ये आल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.