पुणे : शहरात गेल्या 10 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या या पावसाने पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था (Bad condition of the road) झालेली पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांवर तर खड्डे पडलेले आहेतच, मात्र मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे (Potholes) इतके मोठ्या प्रमाणावर झाले आहेत, की पावसाने पुण्यातील सगळ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी जमा झाले आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यापासून म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शहरातील जवळपास 2700 खड्डे बुजवले असल्याचा दावा केला होता. कोट्यवधी रुपये त्यासाठी मोजले होते. मात्र या पावसाळ्यात याची पोलखोल झाली आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून शहरातील जवळपास 2700 खड्डे बुजवण्यात आले. त्याचबरोबर गेल्या आठ दिवसात महापालिकेने रस्त्यांवरील तब्बल 1 हजार खड्डे बुजवले असून आजही रोज जवळपास 150 खड्डे बुजवले जात असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिका दरवर्षी रस्त्यांसाठी 45 कोटी रुपये खर्च करते अणि त्याहूनही पुढे म्हणजे गेल्या 6 महिन्यात जवळपास 18 कोटी रुपये महापालिकेने हे केवळ रस्त्यांच्या डागडुजीसाठी खर्च केले आहेत. पण इतके करूनही पुणेकरांसाठी रस्त्यांचा प्रवास हा वेदनादायी ठरत आहे. रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात ड्रेनेज लाइन फुटल्याने घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. याच चेंबरमधून येणाऱ्या घाण पाण्याने आता नागरिक मात्र त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. सतत पडणाऱ्या पावसाने हे पाणी आता कोंढव्याच्या रस्त्यांवर वाढतच जात आहे. तरीही पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लवकरात लवकर महापालिकेने लक्ष द्यावे अन्यथा पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारादेखील येथील नागरिकांनी दिला आहे.