पुणे : महाराष्ट्रात यंदा मान्सून पावसाचं (Mansoon Update) प्रमाणं सुरुवातीच्या काळात कमी असेल, असं हवामान खात्याकडून (IMD) स्पष्ट करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात जून महिना संपत आला, तरी अद्याप पाऊस (Maharashtra Rain Update) नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी भीषण टंचाई जाणवू शकते. जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 120.40 मिमी पावसाची नोंद होते. पंरतु यंदाच्यावर्षी फक्त 15.10 मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या (Pune Today Mansoon Update) सुरुवातीच्या टप्प्यात 88 टक्के पाऊस गायब झाला असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पीके करपू लागली आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाने सगळ्यात जास्त पाठ फिरवली आहे. मागच्या २१ दिवसात फक्त शहरात 21 मिमी पाऊस झाला आहे. जून महिन्यात पुण्यात सरासरी 112.6 मिमी पाऊस पडतो. या महिन्यात 81 टक्के पाऊस झाला नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीचं स्थिती आहे असं सुध्दा हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
मान्सून सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात राहण्याची अपेक्षा होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यास आठ दिवस उशीर झाला आहे. त्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सून गायब झाला होता.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे वातावरणातील आर्द्रता खेचली त्याचा परिणाम पावसावर मोठा झाला असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञांनी आजपासून पुन्हा राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पुण्यातील हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती वातावरण अनुकूल राहणार आहे.
पुण्यात आणि मुंबईत पुढच्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरातील सापेक्ष आर्द्रता वाढली आहे, काही दिवसात वातावरण अजून अनुकूल होईल. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात शहरातील डोंगराळ भागात मोठा पाऊस होणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी पुढील चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामध्ये पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह मध्य भारतात चांगला पाऊस होईल. त्याचबरोबर दुसऱ्या आठवड्यात मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील.
कोकण आणि गोवा विभागात – 67.60 मिमी – 84 टक्के
मध्य महाराष्ट्र विभागात 13.80 मिमी -86 टक्के
मराठवाडा विभागात 9.40 मिमी – 90 टक्के
विदर्भात 8.50 मिमी -91 टक्के