पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. खुद्द भाजपचे नेते अनिल बोंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही ही मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप (bjp) नेत्यांची राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरत असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे, असं सांगतानाच भाजप हा लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करणार नाही, अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. खुद्द फडणवीस यांनीच आपल्या नेत्यांच्या सुरात सूर मिसळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच उद्या फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेते दिल्लीत जात असल्याने त्याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
पुण्यात मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे. पण भाजपा ही संघर्ष करणारी पार्टी आहे. आम्ही अशी मागणी करण्याचं काहीच कारण नाही. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा राज्यपाल घेतात. मात्र आम्ही लढायला तयार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्टी आहेत. आपण पोलीस ठाण्यात येत असल्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं. तरीही हल्ला होतो याचा अर्थ पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस नाकाम झाले आहेत. पोलीस झेड प्रोटेक्टीला सुरक्षा देऊ शकत नसतील तर इतरांच काय? असा सवाल करतानाच पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. ही मागणी माझी असणार आहे. यासारखं झूंडशाहीचं राजकारण मी पाहिलं नव्हतं. पोलिसांनी कळवून ही त्यांनी सोमय्यांना गुंडाच्या हवाली केलं. जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो ही घटना मात्र दुर्देवी आहे. आम्ही केंद्र सरकारला सांगणार आहोत आणि विभागाच्या सचिवांनाही सांगणार आहोत. जे पोलीस झेड प्रोटेक्टिची सुरक्षा करत नसतील तर आम आदमीचं काय? असा सवालही त्यांनी केला.
राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणणार होते. हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची काय?, असा सवाल फडणवीस यांनी केला. एका महिलेला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं हे योग्य नाही, असंही ते म्हणाले.