पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे चांगलं काम करत असल्याचं नमूद करत ते लोकप्रिय ठरल्याचं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा, असंही मत नोंदवलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा म्हटल्यानं त्यांना काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडला की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन सोशल मीडियावर राजकीय टोलेबाजीही सुरू झालीय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी.”
“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहे. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं? देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, दिशाभूल करणारी विधानं करतात. देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी सांगत नाही. मी आकडे मांडले आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय निर्णय घेतले?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Prithviraj Chavan say Uddhav Thackeray as popular CM demand to make PM