पुणेः एका अल्पवयीन मुलीने (Minor Girl) केलेल्या कृत्यानंतर पुणे तर हादरलच आहे. पण कृत्य पाहून अवघा महाराष्ट्र (Maharashtra) सुन्न होईल. एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केली. इथपर्यंतची घटना ऐकणं कुणालाही सहन होईल, पण त्याही पुढे जाऊन याच मुलीने हे बाळ थेट खिडकीबाहेर फेकून दिलं… मुलगी दुसऱ्या मजल्यावर राहात असल्याने तेवढ्या उंचावरून हे बाळ पडलं… राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सदर बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी माध्यमांना ही धक्कादायक माहिती दिली.
चाकणकर यांनी याविषय़ीचं सविस्तर ट्विट केलंय. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब किती भयंकर आणि सर्वांनीच गंभीर दखल घेण्यासारखी आहे, हे स्पष्ट केलंय.
पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडवे धावडे येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे मुलगी एका खोलीत हा सगळा प्रकार करत असताना तिच्या आईला याची कल्पना होती. किंबहुना मागील 9 महिन्यांपासून आईलाही कल्पना होती. तिनं देखील मुलीच्या अशा कृतीला पाठबळ दिलं, हे धक्कादायक आहे.
पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे.@Dev_Fadnavis @MPLodha @CPPuneCity @ChakankarSpeaks pic.twitter.com/rXmnQoBOGF
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) October 16, 2022
प्रसूतीची वेळ येताच युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती करणारी ही मुलगी 17 वर्षांची आहे. या प्रकरणी तिच्या आईला आणि ज्या डॉक्टरांकडे तिची तपासणी झाली, त्यांनाही या प्रकरणात आरोपी धरले जाईल. तसेच ज्या मुलामुळे ती मुलगी गरोदर राहिली, त्याचाही शोध सुरु असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
या प्रकरणात डॉक्टरांनी महिला आयोगाला किंवा महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात माहिती देणं आवश्यक होतं, अशी भूमिका त्यांनी मांडली. सदर घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कॉलनीतील कार्यकर्त्यांनी ही माहिती तत्काळ महिला व बालकल्याण विभागाला कळवली. त्यानंतर सध्या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.