‘पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला कारमधून बाहेर आल्यावर उभं राहता येत नव्हतं’, कोणी केला खुलासा?

| Updated on: May 28, 2024 | 8:39 PM

पुणे अपघात प्रकरणात व्यवस्थेचे धिंडवणे निघत आहेत. कारण कोट्यधीश बिल्डरने आपल्या लाडक्या मुलासाठी सिस्टिमलाच खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे.

पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला कारमधून बाहेर आल्यावर उभं राहता येत नव्हतं, कोणी केला खुलासा?
Follow us on

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचं प्रकरण वाढतच चाललं आहे. दिवसेंदिवस करोडपती बिल्डरने आपल्या मुलाला वाचण्यासाठी व्यवस्था कशी मॅनेज केली हे समोर येत आहे. गुन्हा आपल्यावर घेण्यासाठी ड्रायव्हरवर टाकलेला दबाव, मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना दिलेले तीन लाख हे आता जगासमोर आलंय. अशातच ज्या वेळी अपघात झाला तेव्हा पोर्षे कारमधून उतरलेले दोघे नशेत असल्याचा दावा एकाने केला आहे. हा दावा नेमका कोणी केला आहे? जाणून घ्या.

ज्या दिवशी पोर्षे गाडीने टू-व्हीलरवर असलेल्या तरूण-तरूणीला धडक दिला तेव्हा घटनास्थळावर रिक्षाचालकही होता. अमिन शेख असं या रिक्षा चालकाचं नाव असून त्याने त्यावेळी काय-काय घडलं? याबाबत टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकाचा खुलासा

रस्ता ओलांडला, मागील बाजूने भरधाव वेगाने कार गेली आणि काही सेकंदात जोरात धडक झाल्याचा आवाज आला. त्या दिशेने पाहिल्यावर गाडीवरील तरूणी हवेत उडाली आणि खाली पडली. रिक्षाची चावी काढली आणि अपघाताच्या ठिकाणी धावत गेलो. अपघातग्रस्त तरूणी तडफडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर त्या ठिकाणी जमलेल्या जमावाने कारमधून दोघांना बाहेर काढत मारहाण करण्यास सुरूवात केली. कारमधून दोघे उतरले तर एक जण पळून गेला होता.

लोक जेव्हा दोन्ही आरोपींना चोप देत होते तेव्हा ते दोघेही आम्हाला मारू नका, जे काही नुकसान आहे ते भरून देण्यासाठी आम्ही तयार आहोत. दोघांची अवस्था पाहून त्यांनी ड्रिंक केली होती हे समजत होतं. कारण त्यांना व्यवस्थित उभंसुद्धा राहता येत नव्हतं. यानंतर दहा ते बारा मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना गाडीत बसून नेलं. त्यावेळी तिसराही पळून गेलेला पोलिसांच्या गाडीत येऊन बसल्याचं अमिन शेख यांनी सांगितलं.

गाडी कोण चालवत होतं?

मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा तिथे लोकांनी दोघांना बाहेर काढून मारायला सुरूवात केली होती. त्यामुळे नेमकी गाडी चालवत कोण होतं माहिती नाही. पण ते लोकांना मारू नका, जे काही नुकसान झालंय ते भरून देतो असं बोलत असल्याचं अमिन शेख म्हणाले.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाच्या खोलात जावून तपास करत आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणानंतर कोणाला शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.