पुण्यात पोर्षे कारनंतर आणखी एक अपघात, सीरम कंपनीच्या मालकीच्या मर्सिडीजने तरुणाला चिरडलं

| Updated on: Jun 18, 2024 | 8:25 PM

Pune Accident Case : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पोर्षे कार प्रकरण ताजे असताना आणखी एक अपघात झाला आहे. मर्सिडीज कारने कुरिअर बॉयला चिरडलं असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यात पोर्षे कारनंतर आणखी एक अपघात, सीरम कंपनीच्या मालकीच्या मर्सिडीजने तरुणाला चिरडलं
Follow us on

पुण्यामधील पोर्षे कार अपघात प्रकरण चर्चेत असताना आणखी एक अपघाताची बातमी समोर आली आहे. सीरम कंपनीच्या मालकीच्या भरधाव मर्सिडीज कारने एका कुरिअर बॉयला चिरडलं. या अपघातामध्ये कुरिअर बॉयचा जागीच मृत्यू झाला असून कार चालकाला पोलिसांच्या हवाली केलं. पुण्यातील येरवडाच्या गोल्फ क्लब चौकात हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  केदार चव्हाण (41) असं अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुरिअर बॉयचं नाव आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून ती कार नंजू उर्फ अर्जुन ढवळे हा चालवत होता.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील गोल्फ कोर्स चौकामधून केदार चव्हाण जात होते. मात्र केदारची गाडी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. दुपारची एक वाजताची वेळ होती. केदार पडला आणि त्यामागून एक मर्सिडीज बेंज येत होती ती सरळ त्याच्या अंगावरून गेली. केदार गंभीर जखमी झाला होता, त्याला रूग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पोलिसांनी कार चालक ढवळे याला अटक केली असून या अपघाताबाबत आणखी तपास करत आहेत.

पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत- चेतन चव्हाण

अपघात प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा. माझा भाऊ घरातील कर्ता होता, आमच्यावर मोठा आघात झाला आहे. यामध्ये कोणीही मोठा असू द्या कारवाई झाली पाहिजे. काही दिवसांपूर्वी माझे वडीलांचे निधन झाले आहे, आता भावाचे, न्याय मिळावा. पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मृत केदारचा भाऊ चेतन चव्हाणने केला आहे.