पुणे | 05 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. काँग्रेसने तर ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संभाजी भिडे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. थेट झुरळाशी तुलना केली आहे. त्यावर आज एका धारकऱ्याने संजय राऊत यांना ललकारलं आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी भिडेंचे समर्थक जमले होते. दुग्धाभिषेक कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याबाबत भिडेंचे समर्थक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भिडे गुरुजींची अवहेलना थांबवावी या मागणीसाठी हे शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी असंख्य धारकरी इथं उपस्थित होते.
पुण्यात बोलताना धारकरी आदित्य मांजरे यांनी सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे. सामनाचा अग्रलेख मी वाचला नाही. जे जे विरोधात बोलले त्यांना उत्तर अवश्य मिळेल.आमच्या शांततेचा फायदा घेवू नका. आमच्यात संयम, शांतता, धाडस आहे, असं म्हणत आदित्य मांजरे यांनी संजय राऊतांना ललकारलं आहे.
भिडे गुरुजी यांच्यासोबत 10 ते 12 लाख धारकरी आहेत. गुरुजींसोबत देश आणि धर्माचं काम आम्ही करत आहोत, असं आदित्य मांजरे म्हणालेत.
काँग्रेस राजवटीतील पुस्तकांतील बाब गुरुजींनी वाचून दाखवली. त्यानंतर गुरुजींविरोधात खालच्या पातळीवर विरोध सुरू आहे. संविधानीक पातळीने आंदोलनं व्हावीत, हे निवेदन आज आम्ही देणार आहोत, असं ते म्हणाले.
भिडे गुरुजी यांच्याविरोधात जी चिखलफेक केली जात आहे. हे अत्यंत चुकीची आहे. गुरुजींवर टीका करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, ही आमची मागणी आहे, असं आदित्य मांजरे यांनी सांगितलं.
भिडे गुरुजी यांच्या विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरही आदित्य मांजरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबत आम्ही बाजू कोर्टात मांडू. गुरुजींची वकिलांची टीम सध्या यावर काम करत आहे. विजय सत्याचा होईल, आमचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुरुजींच्या जिवाला धोका झाला तर जबाबदार कोण?, असा सवालही आदित्य मांजरे यांनी उपस्थित केला आहे.