प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती- पुणे | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. अशात महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. इथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे. मी आतापर्यंत तुमचं ऐकत आलो आहे. आता तुम्हाला माझ ऐकावं लागेल. माझा शब्द मोडू नये, असं मला वाटतं. पण तो तुमचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात काही नियम पाळावे लागतात. आपल्याला माहिती आहे की आधी लोकसभा निवडणूक असेल. मग विधानसभा असेल. बारामती कशी बदलत गेली. विकास कसा होत गेला. हे आपल्याला माहिती आहे. एमआयडीसीला जागा कमी पडायला लागली आहे. मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय साधत गेलो आहे. आपण मला साथ दिली. वडीलधारी मंडळींनी साथ दिल्याने काम करण्यास हुरूप येतो. कंपनीला फायदा होत असेल कंपनीने देखील कामगारांना साथ दिली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
माझा स्वभाव कडक आहे. परंतू कुणावर कधी दबाव आणला नाही. माझ्या जोडीला खासदार असला की केंद्र सरकारची कामे करता येतील. आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच यापुढेही लोकसभेला द्या. बारामतीचा माझ्यासारखा विकास कुणी करू शकत नाही. माझं चिन्ह घड्याळ आहे. जशी जशी निवडणूक येईल तशी तुमच्यावर दबाव येईल, पण मी कुणावर दबाव आणला नाही. आजपर्यंत तुम्ही मला साथ दिली आहे. उद्या लोकसभेला सुद्धा साथ द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
उद्याच्या काळात महायुती उमेदवार जाहीर करणार आहे. उमेदवार दिल्यानंतर तुम्ही साथ द्याल ही खात्री आहे. केंद्रामध्ये आपल्या विचारांचा खासदार गेला. तर लोकांची कामं होतील. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंध चांगले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही बाजूने निधी आला. तर संपूर्ण बारामती मतदारसंघाचा विकास होईल. त्यामुळे महायुती जो उमेदवार देईल. त्याला निवडून द्याल, असा विश्वास आहे, असं अजित पवार म्हणाले.