कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचलं. एकतानगरमध्ये काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. या सगळ्या परिस्थितीचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतली. नुकसानग्रस्त भागात जात अजित पवारांनी पाहणी केली. यावेळी पुणेकरांनी झालेल्या नुकसानीची माहिती अजित पवारांना दिली. सध्या अॅडमिशन प्रोसेस सुरु आहे. त्यासाठीची सगळी कागदपत्रं पाण्यात भिजली आहेत. अनेक कुटुंबांची कागदपत्रं भिजली आहेत. ग्राऊंड फ्लोअरला आमची घरं आहेत. त्यामुळे घरातील वस्तू देखील भिजल्या आहेत, असं गाऱ्हाणं स्थानिक महिलांनी अजित पवारांना सांगितलं.
पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार अॅक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार पोलीस आयुक्तालयात जात आढावा घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयातील कंट्रोल रुममधून शहराचा आढावा त्यांनी घेतला. पुणे महापालिकेच्या आपत्ती विभागातही अजित पवार गेले होते. तिथे त्यांनी पुणे शहरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
पुण्यातील परिस्थिती पाहता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पाऊस आटोक्यात आला आहे. पण नागरिकांना विनंती आहे घाबरु नका… पुण्यात सिंहगड रोड भागात आर्मी तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफचे 40 जवान तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे. त्यामुळे घाबरू नका, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
पुण्यात दोन्ही दादा अॅक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा. उद्याची सुट्टी आजच जाहीर करा. उद्या ऐनवेळी अडचण नको, त्यामुळ आज संध्याकाळपर्यंत ही सुट्टी जाहीर करा. आज जशी अडचण झाली तशी उद्या होवू नये, असं चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.