सुनील ठिगळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नारायणगाव, पुणे | 27 डिसेंबर 2023 : आजपासून महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीतून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय, असं म्हणत पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हा शेतकरी जनआक्रोश मोर्चा होईल. या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे आभार मानलेत.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. आगामी निवडणुकीत अमोल कोल्हे यांचा परभव करण्यासाठी अजित पवार यांनी दंड थोपटलेत. अशातच अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे आभार मानलेत. कालच अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसरमध्ये जात विकासकामांची पाहणी केली. त्यावर बोलतान अजितदादांनी शिरूर मतदार संघात जो दौरा केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मांजरीमधील उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांची त्यांनी पाहणी केली, त्यांचे मनापासून आभार, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपेक्षा करणं काही गैर नाही. मात्र या गोष्टी माझ्यासाठी आता महत्वाच्या नाहीत. महायुतीमध्ये कोणंती जागा कोणाला जाणार या अनेक गोष्टी बाकी आहेत. यावर आता भाष्य करणं योग्य नाही. पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अशी गोष्ट मी करत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
आजपासून सुरु होणाऱ्या शेतकरी मोर्चावरही अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आज हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहोत. पुणे जिल्ह्यात 3 दिवस हा मोर्चा होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर सांगता होणार आहे. शेतकऱ्या विषयाची संसदेत सरकार आम्हाला बोलू देत नसेल. तर रस्तावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा. हीच आमची मागणी आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.