अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 जानेवारी 2024 : उद्या अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पुण्यात बोलताना मोठी घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांबाबत एक गाणं लिहिलं आहे, ते लवकरच सर्वांच्या भेटीला येईल, असं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितलं आहे. अमृता या स्वत: गायिका आहेत. त्यांनी देखील या गाण्यात गायन केलं आहे. हे गाणं लवकरच रिलिज होणार आहे.
प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलं आहे. प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात मी देखील गायलं आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं गाणं सर्वांच्या भेटीला येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
पुण्यात आज ‘वॉक फॉर नेशन’चं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे नमो वॉकथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वॉकथॉनला उपस्थित आहेत. तसंच भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील वॉकथॉनला उपस्थित आहेत. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून ही वॉकथॉन सुरू होणार आहे. इथे बोलताना अमृता यांनी मोठी घोषणा केली आहे.
नमो वॉकॅथॉनबाबतही अमृता यांनी आपलं मत व्यक्त केलं. स्फूर्ती आणि उत्साहाने या नमो वॉकॅथॉन सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत दादा पण इथं आहेत. सगळ्यांमध्ये उत्साह आहे, असं अमृता म्हणाल्या. तसंच जय श्री रामच्या घोषणाही त्यांनी दिल्या.
उद्या अवघ्या देशाचं लक्ष अयोध्या नगरीकडे असेल. अयोध्येतील राम मंदिराचं उद्या उद्घाटन होणार आहे. यावरही अमृता यांनी प्रतिक्रिया दिली. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. ही सुखाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळे राम मंदिर झालं आहे. सगळ्या राम भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.