महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं. तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. जेवढे आरोप शरद पवारांवरती केले जातात, तेवढी आमची ताकद वाढते. आम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना आम्ही फारसं महत्व देत नाही, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.
भाजपमधील पंतप्रधान मोदींपासून ते गल्लीतल्या नेत्यांपर्यंत सर्वजण आता पवारसाहेबांवर टीका करत आहेत. याचा अर्थ पवार साहेब ही एक शक्ती आहे. ही शक्ती जोपर्यंत विरोधी पक्षांत आहे. तोपर्यंत विरोधी पक्ष हा मजबूत राहणार आहे, याची खात्री भाजपला आलेली आहे. त्यामुळे ही शक्ती नष्ट करायला शरद पवार यांच्यावर खोटे-नाटे आरोप करत आहेत, असंही अंकुश काकडे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे असताना सुद्धा शरद पवारांवर आरोप झाले. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. जो माणूस गुजरातच्या तुरुंगामध्ये जाऊन आलेला आहे. ज्याच्यावरती हत्येसारखे आरोप लावले होते. अशा माणसाने शरद पवारांवर आरोप करणं म्हणजे हास्यस्पद आहे. आज ते देशाचे गृहमंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत. परंतु आपण काय होतो याचा त्यांनी विचार करायला हवा. शरद पवार या नेत्यांच्या खोट्यानाट्या आरोपांना कदापी बळी पडणार नाहीत. त्याला उत्तरही देणार नाहीत, असं म्हणत अंकुश काकडे यांनी अमित शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आज महाराष्ट्रात अनेक संस्था पवारांनी उभ्या केल्या आहेत. नावारूपाला आणल्या आहेत. आज त्या संस्था जगाच्या पातळीवरती उत्तम काम करत आहेत. गुजरातमध्ये अमित शहा यांच्या किती संस्था आहेत, आणि त्या कशा पद्धतीने चालतायेत? याची माहिती प्रथम अमित शाह यांनी जनतेला द्यावी आणि मग त्यांनी शरद पवारांना संस्थात्मक भ्रष्टाचार करणारे म्हणावं…, असं काकडेंनी म्हटलं आहे.