योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 14 डिसेंबर 2023 : काल संसदेच्या आवारात गोंधळ पाहायला मिळाला. चार जणांनी संसद परिसरात धुडगूस घातला. दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उडी मारत गोंधळ घातला. तर एक महिला आणि तरूणाने संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडल्या. यात महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश होता. लातूर जिल्ह्यातील झरेगावचा तरूण अमोल शिंदे याने संसदपरिसरात गोंधळ घातला. अमोल शिंदे याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील कायरेशीर मदत करणार आहेत. अमोल शिंदे याला आपण मदर करणार असल्याचं अॅड. असिम सरोदे यांनी जाहीर केलं आहे. फेसबुक पोस्ट लिहित असिम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. अमोल शिंदेला कायदेशीर मदत करण्याचं असिम सरोदेंनी सांगितलं आहे.
संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार आहे. अमोल शिंदे या तरूणाला शिक्षा झाली पाहिजे. त्याने निषेध करण्याचा निवडलेला पर्याय हा चुकीचा आहे. मात्र अमोल शिंदेवर लावलेली कलमं चुकीची आहेत. त्यामुळे अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार, असल्याचं असिम सरोदे यांनी जाहीर केलं आहे.
अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार
अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल.
अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.
त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले.
लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय.
तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे.
त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?