राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होत आहे. या बैठकीवेळी बच्चू कडू यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा त्यांनी तिसरी आघाडी आणि आगामी निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची येत्या 25 तारखेला बैठक होणार आहे. याबाबत बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना माहिती दिली. तसंच निवडणुकीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही पत्र लिहिलं आहे. 18 मागण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अजून काही त्यावर उत्तर आलेलं नाही. पण ते प्रश्न सोडवण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. जर प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत. 25 तारखेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहणार आहोत. त्यांचं उत्तर आलं नाही. तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
राजू शेट्टी यांनी आज सकाळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या आघाडीत एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरु आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलीय. मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी अजून माझी तरी चर्चा झाली नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
तिसऱ्या आघाडीची पुण्यात आज बैठक होत आहे. संभाजीराजे छत्रपती , बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवरह चर्चा होणार आहे. यंदा झालेल्याअतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी दहा दिवसांआधी पाहणी केली. या ओल्या दुष्काळाच्या केलेल्या पाहणीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर काय घडतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.