बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली. तुमच्यावर कोण दादागिरी करत आहे? कोण दादा? आता लोकांना माहिती नाही की दादा कोण? पूर्वी पवार साहेबांसोबत होते म्हणून ते अजितदादा… आता दादा फक्त नाव राहिलं आहे. दादागिरी निघून गेली आहे. आता दिल्लीतून गब्बरसिंग फोन करतात आणि म्हणतात अजित इकडं ये… दादा आणि दादागिरी हा विषय आता संपला आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री केली.
भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची देखील मिमिक्री केली. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी काय केलं? नरेंद्र मोदी आणि अमित शाह राज्यात येतात आणि पवार साहेबांना प्रश्न विचारातात. की एवढ्या वर्षात काय केलं? अरे राज्य तुम्ही चालवत आणि प्रश्न आम्हाला विचारता? यांना सत्तेतून खाली ओढा. सत्तेत राहायचा यांना अधिकार नाही. देश आणि राज्य आम्ही चालवू. 4 जूनला देशात इंडिया आघडीचे सरकार येईल. भाषणं करून विकास होणार नाही, असं म्हणत असतील. तर ताई वाईट वाटून घेऊ नका. आता तुम्ही मंत्री व्हाल आणि उत्तर द्याल, असं भास्करराव जाधव म्हणाले.
7 तारखेला सुप्रिया सुळे यांना लाखोच्या मताने विजयी करा. तुतारी वाजलीच पाहिजे. मी उभा महाराष्ट्र फिरून आलोय. राज्य पालथं घातलं आहे. लक्षात आलं की या राज्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेसोबत गद्दारी झाली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 40 आमदार घेऊन गेले. राज्य आपलं स्वाभिमानी आहे. आता मला खात्री आहे की राज्यात 35 तरी आपल्या जागा येतील, असं आवाहन भास्करराव जाधव यांनी दौंडकरांना केलं आहे.
पवारसाहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले होते. त्यावेळेस मी पाय धरले आणि सांगितलं की साहेब मी चुकलो. पण साहेबांनी मलावर घेतला आणि सांगितलं की अशी चूक पुन्हा करू नकोस. माझी चूक मी कबूल करतोय, याचा मला काही कमीपणा नाही. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका साहेबांना खूप दुःख होईल. महाराष्ट्राच्या सह्याद्रीची मान खाली जाऊ देऊ नका. मोदीसाहेब तयारी ठेवा, शरद पवारसाहेब तुम्हाला हिमालयात पाठवतील. भटकता आत्मा म्हणाले मोदी तुम्हाला आवडलं का? अतृप्त आत्मा तर तुमचा आहे. सत्ता दिली तरी जनतेचा विकास तुम्ही केला नाही. म्हणाल की छोट्या पार्ट्या ठेवायचा नाहीत, म्हणून भटकत आत्मा तुमचा आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.