पुणे : अघोषित लोडशेडिंग (Load Shedding) आणि वीजवसुलीच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पुणे जिल्हा भाजपाकडून पुण्यातील उंड्री (Undri) चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाने कंदील आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवण्याची मागणी यावेळी भाजपा (BJP) कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. कोळसाटंचाई असल्याने राज्य सरकारकडून भारनियमन केले जात आहे. त्यावरून भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. वीजपुरवठा त्वरीत सुरळीत करावा, भारनियममन करू नये, अशी मागणी यावेळी भाजपाच्या आंदोलकांनी राज्य सरकारकडे केली आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. राज्यात भारनियमन विषय जोरात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. वीजप्रश्नावरून टीका करताना, यासंबंधी भाजपा आक्रमक असून आता आंदोलनही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते.
कोळशाची टंचाई केवळ नियोजनाअभावी सहन करावी लागत आहे. यासंबंधी आम्ही जानेवारीत पत्र लिहून सांगितले होते, की कोळशाचे नियोजन करा, 15 दिवसाचे नियोजन हवे. मात्र हे तीन पक्षाचे सरकार आहे. कधी ते एकत्र बसत नाहीत. वेळ आली, की केंद्र सरकारवर खापर फोडतात. त्यांना केंद्र सरकारविरोधात बोंबलण्याचे कामच सुरू असल्याची टीका रावसाहेब दानवेंनी पुण्यात केली होती.