पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. काल पंकजा मुंडेंनी चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांसाठी सभा घेतल्यानंतर आता धनंजय मुंडेंनी मविआचे उमेदवार नाना काटेंसाठी सभा घेतली. दुसरीकडे कसब्यात आजारी गिरीश बापटांना ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात उतरवण्यावरुन मविआ टीका करतेय. त्यात आता चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या उपचारावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
मित्र या नात्यानं आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार सभेत म्हणाले. तर अजित पवारांनी कोणतं इंजेक्शन आणून दिलं., त्याचं नाव सांगण्याचं आवाहन गिरीश महाजनांनी दिलंय. अमित शाह पुणे दौऱ्यावर असूनही कसबा आणि चिंचवडसाठी राजकीय सभा न झाल्याची कुजबूज पुण्यात रंगतेय. त्याऐवजी अमित शाहांनी कोल्हापुरात सभा घेतली..कोल्हापूरच्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांसाठी सज्ज राहण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शाहांच्या दौऱ्याआधीच कोल्हापुरातल्या दोन्ही जागा भाजपनं लढाव्या अशी अपेक्षा असेल,असं विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी केलं होतं.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १० विधानसभांपैकी भाजपकडे एकही जागा नाही तर कोल्हापुरातले दोन्ही खासदार सध्या शिंदे गटात आहेत.दरम्यान कसबा आणि चिंचवड दोन्ही ठिकाणी निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याचं बोललं जातंय. कसब्यात 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळकांनी काँग्रेसच्या अरविंद शिंदेंना 28 हजार 196 मतांनी पराभव केला होता. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना- भाजपची युती होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर ठाकरे गट आहे., तर दुसरीकडे भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि मनसेचा पाठिंबा आहे.
चिंचवडमध्ये 2019 ला भाजपचे लक्ष्मण जगतापांनी अपक्ष राहुल कलाटेंना 38 हजार 498 मतांनी पाडलं होतं. तेव्हा शिवसेना-भाजप युती एकीकडे होती., तर दुसरीकडे अपक्ष कलाटेंना राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता. यावेळी मविआ एका बाजूला आहे. भाजपसोबत शिंदेंची शिवसेना तर वंचितनं अपक्ष राहुल कलाटेंना पाठिंबा दिलाय
27 फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होणारय आणि 2 मार्चला पुणेकरांचा कौल कुणाला मिळतो. याचं चित्र स्पष्ट होईल.