पुणेः पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत भाजपने राजकारणामध्ये पैशाची संस्कृती आणली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
कसबा पोटनिवडणुकीवरून विरोधकांनी आता भाजपवर जोरदार निशाणा साधत मतदानादिवशी भाजपचे नेते पैसे वाटत होते असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे खरे दात पाहिले आहेत अशी गंभीर टीका त्यांनी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने केली आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की, भाजपकडून मतदानासाठी पैसे वाटण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार आता निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
निवडणुकीत पैसे वाटण्यात आल्याने भाजपवर आता कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
रवींद्र धंगेकर हे लोकांचे उमेदवार आहेत, ते निवडून येणार असल्यामुळेच भाजपकडून पैसे वाटण्याचे कुकर्म केले गेले आहे. या प्रकारामुळेच आम्ही त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे असंही नाना पटोले यांनी सांगितले आहे.
कोणत्याही पोटनिवडणुकीत मतदान मोठ्या प्रमाणात केले जात नाही, मात्र यावेळी लोकांनी मतदानासाठी धाव घेतली होती. हे चित्र भाजपला अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे त्यांनी पैशाचा मार्ग अवलंबविला होता. त्यामुळे त्यांनी या पोटनिवडणुकीत मंत्र्यांच्याच हस्ते पैसे वाटण्याचे काम केले आहे अशी गंभीर टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.