पुणे : 21 ऑगस्ट 2023 | पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगच्या दहशतीखाली पुणेकर एक एक दिवस काढत आहेत. या गँगला रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक क्लुप्त्या आखल्या असल्या. तरीही या गँगच्या कारवाया सुरूच आहेत. एकीकडे नागरिकांवर होणारे हल्ले, दरोडे, घरफोडी, चोरी यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. यातच पुणे शहराला चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी एका कारवाईत ड्रग्स माफियांच्या टोळीचा जेरबंद केले आहे. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केले.
सुमेर बिष्णोई याची पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याने हे अफिम त्याचे दोन साथीदार चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांनी दिल्याचे सांगितले. तसेच, या दोघांकडे अंमली पदार्थाचा मोठा साठा असल्याची माहितीही त्याने दिली.
सुमरे याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील गोकुळनगर भागातून चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत यांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. हे अमली पदार्थ नेमके कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.
पुणे पोलिसांनी अटक केलेली ही टोळी राजस्थानची असून त्यातील हे तिघेजण पुण्यात आले होते. या टोळीचे आणखी काही सदस्य पुण्यात किवा राज्यात आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, अमली पदार्थापासून नागरिकांनी दूर रहावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.