काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत. नांदेड आणि कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दौरा आहे. नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जात कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचं समीकरण मांडलं आहे. महत्वाच्या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील राष्ट्रवादीकडे असणाऱ्या दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रासाठीची बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस आहेत. त्यांना जास्तीत जास्त जागा द्या, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे केली आहे. कोल्हापूरमध्ये सहा, साताऱ्यात तीन, सोलापूरमध्ये तीन तर पुण्यात सहा जागा काँग्रेसकडे दिल्या जाव्यात, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.
पुणे शहर काँग्रेसने पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघाची पक्षाकडे मागणी केली आहे. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत मागणी केली आहे. काँग्रेसकडे याधीच शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र हडपसर आणि पर्वती हे दोन्ही राष्ट्रवादीचे मतदारसंघही काँग्रेसकडे घेण्याची शहर काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे ही मागणी केली आहे.
राहुल गांधी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत पतंगराव कदम यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं उद्घाटन पार पडतंय. मल्लिकार्जुन खर्गे , शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा उद्घाटन कार्यक्रम पार पडतोय. सोनहिरा कारखाना स्थळावर या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांचं 11 वाजता कारखाना स्थळावर आगमन होणार आहे. सांगलीतील कडेगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.