पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पुण्यातील (Pune) 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे हडपसर परिसर सध्या पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Coronavirus patient increases in Pune)
गेल्यावर्षी राज्यात कोरोनाची साथ आली तेव्हा पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सुरुवातीच्या काळात पुण्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेने अनोखा फंडा अवलंबला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगली महापालिकेने थेट सैन्यातील निवृत्त सैनिकांनाच मैदानात उतरवले आहे. हे वर्दीतील माजी सैनिक रस्ते, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी महापालिकेकडून माजी सैनिकांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे. हे माजी सैनिक कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. यासाठी 15 माजी सैनिकांच्या एका तुकडीकडून कारवाईला सुरुवातही करण्यात आली आहे. या माजी सैनिकांनी सांगलीच्या बाजारपेठेत फेरफटका मारत नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले.
देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona vaccination) दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला. या लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा
आंगणेवाडी यात्रा मार्ग सील; आंगणे कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा मंदिरात आरोग्य तपासणीनंतर प्रवेश
कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!
Mumbai COVID-19 Vaccination | मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस मिळणार, पाहा यादी
(Coronavirus patient increases in Pune)