पुणे : तारीख होती 28 जून. पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू होता. पण इतक्यात एका तरूणीवर कोयता हल्ल्याची घटना घडली अन् पुणे शहरासह महाराष्ट्र हादरला. पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याची ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील हा सगळा प्रकार आहे. कुणाल कानगुडे असं 19 वर्षीय या तरूणाचं नाव आहे. कुणालने रागाच्या भरात कॉलेजमध्येच कोयता काढल्याची घटना घडलीये.
काही दिवसांपूर्वी कुणाल कानगुडेचा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये आपली दहशत राहावी. तसंच इतरही काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासलं. कुणाल कानगुडे याला अटक करून डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली. पुण्यात कोयता काढणाऱ्या भाईची धिंड काढण्यात आली. कॉलेजमध्ये कोयता काढला तिथूनच काढली त्याची ‘वरात’ काढण्यात आली. अशी कृत्य करण्याचं धाडस होऊ नये. चाप बसावा म्हणून कोयता काढणाऱ्या तरुणाची धिंड काढण्यात आली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत काहीच दिवसाआधी कोयता हल्ल्याची घटना घडली. एका तरूणीवर भरदिवसा कोयता हल्ला झाला. पण या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली आहे. दोन तरूण तिच्या मदतीला धावून आले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांच्या सतर्कतेमुळे या तरूणीचा जीव वाचला.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोयत्याची दहशत पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत.आधी दर्शना पवार हिच्या हत्येने पुणे शहर हादरलं होतं. त्यानंतर पुन्हा तरूणीवर कोयता हल्ला झाला आणि आता तरूणाने कॉलेजमध्ये कोयता नेत्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात ‘कोयत्या’ची दहशत पाहायला मिळत आहे.