पुणे : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका तरूणीवर भरदिवसा हल्ला करण्यात आला आहे. एमपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्याच मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. शिवाय स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तरूणीवर कोयत्याने हल्ला झाला त्यावेळी दोन तरूण धावून आले. त्यामुळे या मुलीचे प्राण वाचले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरूणांच्या धाडसामुळे ही तरूणी थोडक्यात वाचली. या घटनेवेळी नेमकं काय घडलं? या दोघांनी तिचा जीव कसा वाचवला? याचा घटनाक्रम tv9 मराठीशी बोलताना त्यांनी सांगितला.
लेशपाल जवळगे याने सांगितलं की, सकाळी साडे नऊच्या सुमारास मी अभ्यासिकेत येत होतो. तितक्यात मोठा आवाज झाला. मागे वळून पाहिलं तर तोवर त्या मुलानं तिच्या खांद्यावर वार केला होता आणि ती मी जिकडे उभा होतो, त्याच दिशेने धावत आली. तो मुलगा कोयता घेऊन पळतोय. ती मुलगी मला वाचवा म्हणत पुढे पळतीये. पण आजूबाजूचे लोक फक्त बघत बसलेत. ते बघून मला खूप कसंतरी झालं. ती मुलगी एका दुकानात जायचा प्रयत्न करायला लागली. तर त्या दुकानवाल्याने शटर खाली केलं. त्यामुळे ती मुलगी दुकानाच्या दारातच खाली बसली.
माझ्या खांद्यावर बॅग होती. ती खाली टाकली अन् मीही पळत मागे गेलो. तो तिच्यावर पुढचा वार करणार इतक्यात मी त्याला मागून जाऊन पकडलं. तितक्यात हर्षदही माझ्या मदतीला आला. मग जे फक्त लांबून बघत होते. तेच त्या मुलाला मारायला आले अन् पुढच्या 3-4 सेकंदात त्या मुलीचा जीव वाचला, असं लेशपाल जवळगेने सांगितलं.
हर्षद पाटील यानेही ही थरारक घटना डोळ्यासमोर उभी केली. तो म्हणाला, मी अभ्यासिकेच्या खाली एका मित्राशी बोलत थांबलो होतो. तितक्यात आरडाओरडा ऐकायला आला. पाहिलं तर एक मुलगा कोयता घेऊन धावत येताना दिसला. आधी मला वाटलं की ही कोयता गँग आहे. त्यामुळं मी मागे सरकलो. पण नंतर लक्षात आलं की तो मुलीच्या मागे धावतोय. तेव्हा लेशपाल तिच्या मदतीसाठी धावत पुढे गेला होता. लेशपालने त्याला मागून पकडलं होतं. मीही लगेच त्याचा हात पकडला. त्याच्या हातातून कोयता घेतला. तितक्यात मग माझे मित्र पण आले.
पण या सगळ्या घटनेत एक वेगळाच पेच समोर उभा राहिला. कारण आजूबाजूला उभे असणारे लोक आता त्या तरूणाला जे मिळेल त्याने मारत होते. वीट, कुंडीने त्याला मारायला लागले. या सगळ्यात आम्हालाही मार लागला. पण एमपीएससीचा अभ्यास करत असल्याने कायदा हातात घेऊ नये, याची जाण होती. मग आम्ही त्याला पेरूगेट पोलीस स्टेशनला नेलं, असं हर्षद पाटीलनं सांगितलं.
लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघा तरूणांच्या धाडसामुळे त्या तरूणीचा जीवा वाचला. या दोघांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.
कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी 51 हजारांचं बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून य तरुणीचा जीव वाचवला. या दोघांचं कौतुक आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थक मदत जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.