पुणे : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी पुण्यात सुरू झाली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने (Dagdusheth Ganpati) आतापासूनच गणेशोत्सवाची केली तयारी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी पंचकेदार मंदिर हिमालय याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंदिराच्या देखाव्याच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. पूजा करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर (Panchkedar temple) या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला आहे. शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. दरम्यान, कोरोनाच्या सावटात मागील दोन वर्ष गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या होत्या. यंदा धुमधडाक्यात हा उत्सव साजरा होणार आहे.
पुण्याच्या सणस मैदानासमोरच्या हिराबाग कोठीमध्ये दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सजावट विभागात या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांनी याची सुरुवात केली. शंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या पाच नावांनी पंचकेदार प्रसिद्ध आहे. हिमालयातील हे एक प्राचीन मंदिर आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हे पंचकेदार मंदिर उभारले जाईल. यात बाप्पा विराजमान होणार आहे.
पंचकेदार मंदिर शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार साधारणपणे 100 फूट लांब, 50 फूट रूंद तर 81 फूट उंच असणार आहे. सुंदर अशा लाकडावर कोरीवकाम त्याचप्रमाणे आकर्षक रंगसंगतीने हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर त्यावर दिवे बसवले जाणार आहेत. सजावटीच्या या कामात जवळपास 40 कारागीर काम करीत आहेत. राजस्थानातील कारागीर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपात भाविकांना दर्शन घेताना अडचण येवू नये, म्हणून सुटसुटीत रचना केली जाणार आहे. लांबून दर्शन घेणे यामुळे सोयीस्कर होणार आहे. दरवर्षी दगडूशेठ गणपती ट्रस्ट नवनवीन देखावे सादर करत असते. देशभरातील प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती गणेशोत्सव सोहळ्यात उभारल्या जातात. भाविकांसाठीही हे मोठे आकर्षण असते.