पुणे: राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणीकपातीची टांगती तलवार आता दूर झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 26 धरणांपैकी तब्बल 19 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या चार वर्षांत यंदा प्रथमच 26 जुलै रोजी 19 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी जिल्ह्य़ातील धरणांमध्ये ऑगस्टअखेरीस इतका पाणीसाठा जमा होतो. यंदा जुलै महिन्यात केवळ आठ दिवसांत जिल्ह्य़ाच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस होऊ शकतो. या भागात 30 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला होता. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आणि काही प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याची अंतिम कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल.
इतर बातम्या :