राज्यात विधानसभा निवडणुकीचा ‘धुरळा’ उडालाय. अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशात दौंड तालुक्यात मात्र ‘वेट ॲण्ड वॉच’चं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जागावाटपात दौंडची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाच्या दोन उमेदवार याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्यापर्यंत दौंडच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच इच्छुक उमेदवार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश थोरात यांनी आज दौंडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागितली. राज्यात एक वर्षात अनेक घडामोडी झाल्या. भारतीय जनता पार्टीचा अनुभव खूप वाईट आला. शरद पवार आमचे दैवत आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. माझी उमेदवारी शरद पवार उद्या पर्यंत जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीसोबत मी राहू शकत नाही, असं रमेश थोरात म्हणाले.
दौंडमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपने राहुल कुल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शरद पवार गटाच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात आहे. अजित पवार भाजपसोबत गेले. तेव्हा रमेश थोरात हे त्यांच्यासोबत महायुतीत गेले. मात्र महायुतीत दौंडची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश थोरातांना शरद पवार गटात प्रवेश करायचा आहे. निवडणूक लढवायची आहे.
थोरात अजित पवारांसोबत गेले तेव्हा अप्पासाहेब पवार यांनी शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहणं पसंत केलं. ते देखील दौंडमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात जो सोबत राहिला त्याला उमेदवारी द्यायची की तालुक्यात प्रभाव असणाऱ्या रमेश थोरातांना तिकीट द्यायचं? असा पेच शरद पवारांना समोर आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार दौंडमधून कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.