तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा? हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. बोलणार हवा असला तर आपली तुतारी वाजलीच. माझ्यावर टीका करायला काही नाही म्हणून अशी टीका करतात. माझं चॅलेंज आहे की मी किती वेळा दौंडमध्ये आले आणि तुम्ही किती वेळा दौंडमध्ये आला आहात. याचा हिशोब काढा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पुण्यातील दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
दौंडला मी महिन्यातून एकदा तरी येतेच. मी आभार मानते की तीन वेळेस मला संसदेत जायची संधी दिली माझं चिन्ह आता बदलला आहे. मी पक्ष नाही. बदलला चिन्ह बद्दललं आहे… दौंडमध्ये एकत्रित काम आपण केलं. लोक माझ्यावर टीका करत आहेत. म्हणतात की भाषण करून विकास होत नाही. माझं म्हणणं आहे की भाषण करूनच विकास होत कारण ही लोकशाही आहे. तुमचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी मी भाषण करते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सभेला संबोधित केलं.
आज दौंडमध्ये दमदाटी करत आहेत. पाणी बंद होईल म्हणून… धमक्या देतात. पाणी तुमच्या घरचं नाही. कॅनल तुमच्या घरचा नाही. हे पाणी माझ्या शेतकऱ्यांचा आहे. कुणीच माईका लाल दौंड आणि बारामतीचे पाणी बंद करतो ते बघते. तुमचा ऊस पण कुणी अडवणार नाही. कसं अडववतात ऊस तेच बघते. कुणीही उसामध्ये गडबड केली तर तुमच्यासाठी आंदोलन मी करेन माझा शब्द आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी स्थानिकांना आश्वासन दिलं.
रात्र वैऱ्याची आहे पुढील दोन चार दिवस काय होईल ते सांगता येत नाही. लक्ष असू द्या. सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा सगळेच येतील. उद्या इथला प्रचार संपला की शिरूरला अमोल दादा ची तुतारी वाजवायला जायचं आहे… कोणीही आराम करू नका. आपल्याला भरपूर काम आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.