15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता. पण याच दिवशी दौंडमधील विद्यार्थिनींची अन्यायाविरोधातली लढाई सुरु झाली. ज्या शाळेत विद्यार्थ्यांनी भविष्याचे धडे गिरवायला हवेत. त्याच शाळेत अल्पवयीन मुली लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील मुलींना अश्लील व्हीडिओ दाखवत शिक्षकाने विद्यार्थिनींना धमकावलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं. जवळपास 7 ते 8 विद्यार्थिनींवर या शिक्षकाने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. बापूराव धुमाळ असं या शिक्षकाचं नाव आहे. या आरोपी शिक्षकाला आता अटक झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मळदच्या नवीन माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने 7 ते 8 विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ हा फरार होता. घटना उघडकीस आल्यानंतर आठ दिवसांनी त्याला सासवडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांनाही अटक झाली आहे.
शाळेतील विद्यार्थिनींना हा शिक्षक फोन करायचा. त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. त्याचे व्हीडिओ रेकॉर्ड करायचा आणि जर या मुलींनी विरोध केला. तर तेच अश्लील व्हीडिओ दाखवत तो विद्यार्थिनींना धमकवायचा. एका मुलीला वारंवार धमकी देण्यात आल्यानंतर तिने तिच्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. 15 ऑगस्टला ही घटना समोर आली.
पीडित मुलीचे पालक आणि इतर गावकऱ्यांनी नवीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना या सगळा प्रकार सांगितला. तात्काळ या शिक्षकावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्याध्यापक वाखारे यांनी हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर आपण संचालक मंडळाशी बोलून निर्णय घेऊयात, असं सांगितलं. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांनी याबाबत ठोस पावलं न उचलल्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर कारवाईला पाच ते सहा दिवस टाळाटाळ केल्या प्रकरणी मुख्याध्यापकांना अटक झाली. आरोपी शिक्षक मात्र या दरम्यान फरार होता. पण आठ दिवसांनंतर पुण्यातील सासवडमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
बापूराव धुमाळ हा शिक्षक 2005 साली नवीन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी रुजू झाला. इंग्रजी हा विषय तो शिकवत होता. अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक अशी त्याने त्याची प्रतिमा तयार केली. मात्र नंतर याच धाकाखाली त्याने मुलींचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. वर्ग सुरु असतानाही तो मुलींसोबत अश्लील चाळे करत असे. मध्यंतरी याच शाळेतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. त्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे हा शिक्षकच असल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संचालक मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप असताना संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई का केली गेली नाही? हा सवाल अनुत्तरित आहे. शाळेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी नवी नियुक्ती का गेली नाही? असाही सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. शाळेत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. शाळकरी मुलींचं असं शोषण करणं अतिशय गंभीर आहे. याबाबत दखल घेत संबंधित शिक्षकावर कारवाई केली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही मळद या ठिकाणी जात घटनेची माहिती घेतली. तसंच कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत.