पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी घटनेची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाची ऑर्डर धक्कादायक आहे. आम्ही रिव्हिजन पिटीशन दाखल केली आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दोन लोकांचा जीव घेतल्यानंतर लिनियंटली सोडून दिलं गेलं हे सहन केलं जाणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
पोलिसांनी कारवाई करत 304 कलम लावलं होतं आणि ज्युवीनाईल कोर्टाकडे प्रकरण पाठवलं. यामध्ये पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलंय की, दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर अल्पवयीन मुलं गंभीर गुन्ह्यात सहभागी असतील तर कडक कारवाई व्हावी अशी शिफारस केली होती. मात्र ज्युवीनाईल कोर्टाने घेतलेला निर्णय आश्चर्यचकारक आहे. ज्युवीनाईल कोर्टाने घेतलेला निर्णय सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सत्र न्यायालयाने पुन्हा ज्युवीनाईल कोर्टाकडे प्रकरण पुनर्वीचार करायला न्यायला सांगितलं आहे. आम्हाला आशा आहे की आज किंवा उद्या ज्युवीनाईल कोर्ट याबाबत निर्णय देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या पोर्शे कारचा चालक हा अल्पवयीन होता. या कारने दुचाकीला एवढ्या जोरात धक्का दिला की या धडक दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला.
पुण्यात गंभीर घटना घडली. त्या घटनेच्या संदर्भात तुम्हाला कल्पना आहे. एका मुलाने गाडी चालवत असताना अपघात केला आणि दोन लोकांचा जीव घेतला. एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्या घटना घडल्या, या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी आहे. या संदर्भात आज पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलं आणि पुढची अॅक्शन काय आहे. आणि अशा घटना घडू नये म्हणून काय करता येईल यावर चर्चा झाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.