ईशान गोखले पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवारी मिळवणार? असा प्रश्न असतानाच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुण्यातून खासदारकी लढवणार असल्याची बातमी समोर आली. भाजपकडून या बातमीचं किंवा केल्या जाणाऱ्या दाव्याचं खंडन जरी करण्यात आलं असलं तरी यामुळे पुन्हा एकदा पुण्यात भाजपचा चेहरा कोण? या प्रश्नाने पुन्हा तोंड वर काढलंय.
पुण्याची ताकद गिरीश बापट अशी ओळख निर्माण केलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून पुढील निवडणूकीत उमेदवार कोण असणार याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. केवळ भाजपच नाही तर आता इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही खासदारीची जाहीरपणे इच्छा बोलून दाखवली आहे. पण भाजपकडून केले जाणारे हेवे दावे हे आजचे नसून फार पूर्वीपासूनच चालत आले आहेत. भाजपकडून आतापर्यंत केले जाणारे दावे पाहता यात देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक, संजय काकडे, स्वरदा बापट, सुनील देवधर यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागलीये.
राज्यात मविआ सरकार पायउतार होऊन काहीच दिवस झाले असताना फडणवीस पुण्यातून खासदारकी लढवणार या चर्चांनी जोर धरला होता. ब्राम्हण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून थेट फडणवीसांना पुण्यातून खासदारकी देण्याची मागणी देखील केली होती. फडणवीसांना उमेदवारी दिल्यास ब्राम्हण महासंघ भाजपला पाठिंबा देईल अशी भूमिका देखील घेण्यात आली. यावर खासदार गिरीश बापट यांनी देखील फडणवीसांचं कौतुक करत त्यांना खासदारकी दिल्यास मला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. याच काळात पालकमंत्री पदाच्या वाटण्या देखील होणार होत्या. देवेंद्र फडणवीसच पुण्याचे पालकमंत्री होतील अशा बातम्या काही वृत्तसंस्थानी देखील प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र पालकमंत्रीपद आणि खासदारकी या दोन्ही दाव्यांचं स्वतः फडणवीसांनीच खंडन केलं.
मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीसांच्या निकटर्तीय मानले जातात. 2019 ते 2022 या कालावधीत मोहोळ हे पुण्याचे महापौर होते. याच कालावधीत त्यांच्या कामाची नोंद केवळ भाजपच नाही तर तेव्हा सत्तेत असणारे मविआ सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील घेत होते. मोहोळ यांच्या कोरोना काळातील कामांचं अजितदादा जाहीर रित्या कौतुक करायचे. गिरीश बापटांनंतर पुण्यातील मास लीडर म्हणून मुरलीधर मोहोळ यांना पाहिलं जातं. तर अलिकडेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची माळ मोहोळ यांच्या गळ्यात घातली. एका कार्यक्रमात बावनकुळेंनी ‘सर्वाधिक पाठिंबा मिळणारा चेहरा मोहोळ यांचा आहे’ असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपकडून मोहोळ यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर झाली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या.
जगदिश मुळीक हे 2014 विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. 2019ला राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी त्यांचा पराभव केला. काही काळानंतर मुळीक यांना पुणे शहराध्यक्ष पद मिळालं. या पदावर असताना अनेक वेळा पुण्यात आंदोलन, मोर्चे काढत त्यांनी तत्कालीन मविआ सरकारच्या नाकात दम केला होता. मुळीक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकवले होते. आणि मुळीकांच्या खासदारकीवरून शक्तीप्रदर्शन केलं होतं. मात्र यानंतर मुळीक यांनी हे बॅनर काढयला लावून पक्ष जी जबाबदारी देईल ती स्विकारेन अशी भूमिका घेतली होती.
संजय नाना काकडे हे सध्या भाजप उपाध्यक्ष पदावर काम करत आहेत. भाजपने काकडे यांनी याआधी राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली होती. 2017च्या पुणे मनपा निवडणुकात भाजपच्या यशामागे देखील काकडे यांचा मोठा वाटा होता. काकडे यांनी पालिकेत 100 नगरसेवक घेऊन जाणार असा दावा केला आणि निवडणूकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून देखील आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळीच काकडे खासदारकीसाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी भाजपने बापट यांना संधी दिल्याने काकडे नाराज असल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या होत्या. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता पुन्हा काकडे यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या उमेदवारीच्या रेसमध्ये संजय काकडे देखील टिकून आहेत.
स्वरदा बापट दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून आहेत. सध्या स्वरदा बापट या पुणे भाजप शहर उपाध्यक्षा असून यापुर्वी त्यांनी सांगली महापालिकेत नगरसेविका पद देखील भूषवलं आहे. गिरीश बापटांचा वारस म्हणून स्वरदा बापट यांच्याचकडे बघितलं जातं. खासदारकीच्या उमेदवरीवर त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ‘लढण्याची संधी द्या,गुलाल उधळून दाखवते अशी प्रतिक्रिया दिली होती.
सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक राहिले आहेत. आणि भाजप त्यांच्या नावाचा विचार करत असल्याची माहिती देखील अलिकडेच समोर आलीये. देवधर यांचा जन्म हा पुण्याचाच असून तब्बल 12 वर्ष त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिलंय. मात्र त्यांची खरी ओळख ही ईशान्य भारतातील राज्यांमध्ये संघ आणि भाजपची संघटना वाढवणं आणि मजबूत करणं ही आहे. त्रिपूरामध्ये 2018मध्ये तब्बल 25 वर्ष सत्तेस असणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या पक्षाला धूळ चारत देवधर यांनी भाजपला विजय मिळवून दिला होता. ईशान्य भारतात त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक कामं केली असून त्यांचा मोठा जनसंपर्क देखील आहे. इतकच नाही तर 2014 ला मोदींच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी देखील देवधर यांनी पार पाडली आहे. ज्यात मोदींचा मोठ्या फरकाने विजय झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच फूट पडण्याच्या आधीपासूनच शहराध्यक्ष आणि माजी महापौर राहिलेल्या प्रशांत जगताप यांच्या नावाची खासदारकी साठी चर्चा आहे. मात्र मविआमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे येत असल्याने काँग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद जगताप आणि आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव समोर येतंय. राष्ट्रवादी पक्ष एक असताना अजित पवार आणि नाना पटोले या दोघांनीही जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला होता. मात्र आता अजित पवार गट वेगळा झाल्याने तो भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात पुण्यातील दौरा आणि बैठका वाढवल्या आहेत. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देखील त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर दिली आहे. तर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिलेले मनसेचे वसंत मोरे देखील पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. मला पुण्याचा खासदार व्हायचंय असं वक्तव्य मोरे यांनी केलंय. तर राज साहेबांनी संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार मी असणार असं ही ते म्हणालते.
या सर्व हेवे दाव्यांमध्ये आता पुण्यात खासदारकीचं तिकीट कोण मिळवतं की आणखीन कुणी या यादीत येतं हे पहावं लागणार आहे.