पुणे : पुण्यामध्ये आज भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आलीय. शरद मोहोळवर कोथरूडमधील सुदारदरा परिसरात गोळ्या घातल्या गेल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील मोहोळ टोळीचा म्होरक्या असलेल्या शरद मोहोळला भरदिवसा संपवल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. शरद मोहोळ याच्या खूनामुळे परत एकदा टोळीयुद्धाला सुरूवात होते की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली आहे. कारण याआधी मारणे आणि मोहोळ टोळीने रक्ताची खेळलेली होळी सर्वांनी पाहिली आहे. अशातच यावर भरदिवसा झालेल्या शरद मोहोळच्या खूनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणताही गँग वॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळं गँग वॉर करण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
🕔 5.10pm | 5-1-2024 📍 Pune | संध्या. ५.१० वा. | ५-१-२०२४ 📍 पुणे.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Pune https://t.co/Se9AZyazxl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2024
शरद मोहोळ याच्यावर भर दिवसा दुपारी दीड वाजता गोळ्या घालण्यात आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार त्याच्या जवळच्या साथीदाराने त्याला संपवलं आहे. नेमका तो कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून आणि का केलं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोहोळ आणि मारणे या दोन टोळींमधील वैर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मारणे टोळीकडून कट रचला गेला तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी शरद मोहोळचाच जवळचा साथीदार आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याने मुळशी मधील दासवे गावचे सरपंच शंक धिंडले यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर मारणे टोळीमधील किशोर मारणेला निलायन टॉकीज जवळ संपवलं होतं. पुण्यातील जर्मन बेकरीमधील आरोपी कतील सिद्दीकी याची अंडा सेलमध्ये शरद मोहोळ याने विवेक भालेराव याच्या साथीने हत्या केली होती. या घटनेनंतर शरद मोहोळ चांगलाच चर्चेत आला होता.