एखाद्या चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे अपघाताची विचित्र घटना पुणे-सातारा महामार्गावर किकवी (ता. भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. चक्क महामार्गावरील किकवी येथील हॉटेल प्रणव ते धांगवडी (ता. भोर) येथील हॉटेल सद्गुरू प्युअर व्हेज अशी दीड किलोमीटर अंतरापर्यंत कारचालकाने चालू महामार्गावरून रस्त्यावर प्रवास करणाऱ्या कोणाच्याही जीवाची पर्वा न करता दुचाकीला भरधाव फरफटत नेले.
या अपघातामध्ये दुचाकी (MH 12 MC 2608) वर स्वार असणारे पांडुरंग किसन मोरे आणि कोमल पांडुरंग मोरे(दोघेही रा. मोरवाडी ता. भोर) हे गंभीर जखमी झाले असून तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आणि राजगड पोलिसांनी जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेमध्ये नेऊन नसरापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा महामार्गावर पांडुरंग मोरे हे दुचाकीने प्रवास करत असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी स्विफ्टने (MH 12 WE 4153) भरधाव वेगात मागून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरील बोनेटला ही दुचाकी अडकली. यावेळी पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे दोघेही खाली पडले. त्यानंतर निर्दयी कारचालकाने आपले वाहन न थांबवता त्या दुचाकीला तसेच फरफटत नेले. 22 ऑगस्टला दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता.
दरम्यान, ही बाब रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी करचालकास रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने दुचाकीसहीत तीन किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यावेळी प्रवासी आणि राजगड पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु करचालकाने कार दीड किलोमीटर नंतर महामार्गावर उभी करून पळ काढला. सदर घटनेबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस करीत आहे