पुणे : फेसबुक पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण पुणे पोलिसांनी वाचवले. नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे तरुणीने थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे तरुणीचा जीव वाचला. 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. (Pune Girl saved by Police after suicide attempt warning Facebook post)
“मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करु शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय’ असं फेसबुक पोस्टमध्ये लिहून पुण्यात राहणारी संबंधित तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी घराबाहेर पडली होती. फेसबुकवर हा मजकूर वाचून पोलिस यंत्रणा सतर्क झाली.
पोलिसांनी धावाधाव करुन तांत्रिक माहितीच्या आधारे तिच्या आई-वडिलांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर तरुणीच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन तिच्याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु पोलिसांकडूनच आई-वडिलांना मुलीबाबत माहिती मिळाल्याने त्यांनाच मोठ्ठा धक्का बसला.
तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद आढळला. त्यानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. एका मित्राकडे तिच्याविषयीची थोडी माहिती मिळाली. त्या माहितीच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील दामिनी पथकाने काही वेळातच तिला शोधून काढले.
महिला पोलिसांनी चौकशी केली असता नैराश्येत येऊन आत्महत्या करत असल्याचं तिने सांगितलं. पुण्यातील दामिनी पथकाच्या सुजाता दानमे यांनी तरुणीचे समुपदेशन केले. तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. एका फेसबुक पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं.
फेसबुकवर लाईव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्यातील युवकाचे प्राण आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वाचले. 23 वर्षीय युवक टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना फेसबुक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी संबंधित तरुणाचा जीव वाचवला. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा धुळे पोलिसातील होमगार्डचा मुलगा आहे. संबंधित 23 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरु केले. लाईव्ह चालू असतानाच त्याने स्वतःच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रात्री 8 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडताना आयर्लंडमधील फेसबुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) रश्मी करंदीकर यांना फोन केला. करंदीकरांनी तातडीने पावलं उचलत धुळे पोलिसांशी संपर्क साधला. विशेष म्हणजे अवघ्या 25 मिनिटात स्थानिक पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्यापर्यंत पोहोचून प्राण वाचवले. (Pune Girl saved by Police after suicide attempt warning Facebook post)
मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचला. 23 वर्षीय तरुणी अक्सा बीचला स्वतःचा जीव देण्यास जात असल्याचं पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना समजलं. त्यांनी तात्काळ मालवणी पोलीस ठाण्याला याविषयी कळवलं. पोलीस निरीक्षक रजाने आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी तत्काळ अक्सा बीचवर धाव घेतली. फोटोच्या सहाय्याने पोलिस तिचा शोध घेत होते. इतक्यात एक महिला समुद्रात कंबरेइतक्या पाण्यात जात असल्याचं त्यांना आढळलं. एपीआय कदम यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन तिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या वक्तशीरपणामुळे तरुणीचा जीव बचावला.
संबंधित बातम्या :
फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, आयर्लंडमधून सूचना, करंदीकरांच्या प्रयत्नांनी युवक बचावला
पोलिसांची धावपळ फळाला, अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला कंबरेभर पाण्यातून वाचवलं
(Pune Girl saved by Police after suicide attempt warning Facebook post)