हडपसर, पुणे | 26 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून आणणार, असं अजित पवार म्हणालेत. त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते.
अजित पवार यांनी आज हडपसरमध्ये जात विकासकामांची पाहणी केली. मांजरी पाणीपुरवठा योजनेची शिवाय मांजरी रेल्वे गेट पुलाच्या कामाची पाहणी अजित पवारांनी केली. 2017 पासून या पुलाचं काम सुरू आहे. पुलाचे बांधकाम चुकीचं झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. शिवाय ज्यांची जमीन गेली आहे. त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही. या पुलावर आतापर्यंत 10 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या पुलाची आज अजित पवार यांनी पाहणी केली आहे.
काल तुम्ही चॅलेंज दिलं. त्यानंतर आज तुम्ही शिरूर मतदारसंघात आला आहात, असा प्रश्न विचारताच अजित पवार यांनी त्याला उत्तर दिलं. काल दिलेल्या चॅलेंजचा आणि आज केलेल्या पाहणीचा काहीही संबंध नाही. आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनादरम्यान या कामाची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मी आज इथं आलो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी पाहणी केली, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता थेट घणाघात केला. कोल्हेंना निवडणुकीत पाडणारअ असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यासमोर त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांचं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे.