लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, पुण्याला अतिवृष्टीचा इशारा, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर

| Updated on: Jul 25, 2024 | 10:08 AM

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.

लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, पुण्याला अतिवृष्टीचा इशारा, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर
Follow us on

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या जवानांकडून सुखरुप बाहेर काढले जात आहे. तर दुसरीकडे पुण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने सतर्क राहून खबरदारी घ्यावी

पुणे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 मिमी आणि घाटमाथ्यावर 200 मिमीपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.

यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. तर गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसरातही पाणी साचले आहे. त्यासोबतच डेक्कन परिसरातील शितळा देवी मंदिर, संगम पूल आणि पुलासमोरील वस्तीत पाणी शिरले आहे. तसेच कॉर्पोरेशन जवळील पूल आणि होळकर पूल परिसर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पाटबंधारे विभागाने केल्या आहेत.

अजित पवार, सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर

पुण्यात रेड अलर्ट जारी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्वीट करत नागरिकांना आवाहन केले आहे. “पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे”, असे ट्वीट अजित पवारांनी केले आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांनीही गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे. पुणे आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे . याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी,पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथं प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरिकांना देखील विनंती आहे की,अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे, काळजी घ्या, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन

हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर पुणे शहर पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागातील खडकवासला , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरु होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

पुण्यातील लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. लोणावळ्यात 1 जून पासून 2971 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 2638 मिमी पावसाची नोंद झाली होती.