इंदापूर (पुणे) : अपघातग्रस्तांच्या मदतीला जाण्याऐवजी त्यांचे फोटो-व्हिडीओ काढण्यात धन्यता मानणाऱ्या बघ्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. मात्र नुकतीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी अपघातग्रस्तांना एकत्रित मदत केल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात झालेल्या अपघाताची दृश्यं पाहून दोघांनी धावाधाव केली.
काय आहे प्रकरण?
बारामती इंदापूर रोड वरील अंथुर्णे येथे वाहनाचा अपघात झाला होता. या मार्गाने प्रवास करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघात पाहून गाडी थांबवली. त्याच मार्गावरून जाताना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनीही थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांना मदत केली.
राजवर्धन पाटील-सुप्रिया सुळेंची एकत्रित मदत
अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी प्रयत्न केले. राजवर्धन पाटील यांनी वाहनाची व्यवस्था केली तर सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून अपघातग्रस्तांना ताबडतोड मदत होईल असे प्रयत्न केले.
सुळे-पाटील यांचे राजकीय वैमनस्य
राजकीय क्षेत्रात या दोन्ही मातब्बर नेत्यांचे पक्ष भिन्न आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वाकयुद्धही रंगलं होतं. मात्र अशा अडचणीच्या प्रसंगी दोन पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन केलेल्या मदतीमुळे उपस्थित नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
“भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता?”
हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी दोन वर्षांपूर्वी अत्यंत मिश्कील भाष्य केलं होतं. हर्षवर्धन पाटील यांचं भाषण ऐकून मी खूप वेळा त्यांना फोन केला होता. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राहुल गांधी, हर्षवर्धन पाटील आणि माझी कधीच भेट झाली नाही, असा दावा करत भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता, असा टोमणाही सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.
संबंधित बातम्या :
कॉपी करुन पास झालेल्यांनी पुण्याचं वाटोळं केलं, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल
भरणे म्हणतात, पाटलांना मी लई भीतो; आता सुप्रिया सुळे म्हणतात, तुम्ही तर त्यांना कुस्तीत चितपट केलं
वाद दीराशी, नवरा कशाला सोडायचा? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोमणा