पुणेः पुणे जिल्ह्यातील (Pune) नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून ग्रामीण भागातील CNG पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. CNG चालकांनी बेमुदत संप पुकारल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या वाहतुकीवर होणार आहे. आज सकाळपासूनच ग्रामीण भागातील सीएनजी पंप (CNG Pump) बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. टोरंट कंपनी (Torrent Gas company) आणि CNG पंप चालक यांच्यातील वादाचा फटका ग्रामीण भागातील प्रवासी, रिक्षाचालक यांना बसणार आहे. मात्र पुणे शहरातील MNGL ची सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील CNG पंप चालकांना गुजरात येथील टोरंट गॅस कंपनीकडून CNG चा पुरवठा करण्यात येतो. या गॅस पुरवठ्यावरील कमिशन वाढवून देण्याची पंप चालकांची मागणी आहे. पुरवठ्यावरील कमिशन वाढवून देण्यासंबंधीचा करार २०२१ मध्येच झाला होता. मात्र अद्याप कमिशन वाढवून मिळत नसल्याचा CNG चालकांचा आरोप आहे.
पुण्यातील CNG चालकांनी याआधीही तीन वेळा बंद पुकारला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेण्यात आली होती. त्यावेळी टोरंट गॅस कंपनीकडून आश्वासन देण्यात आलं होतं.
गुजरातच्या टोरंट गॅस पुरवठा कंपनीविरोधात पुण्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. 27 जानेवारी रोजी पहाटेपासून ग्रामीण भागातील CNG पंप बंद ठेवण्यात आले आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाने 1 नोव्हेंबर 2021रोजी सीएनजी विक्रीतील नफ्यासंबंधी एक सुधारीत नियमावली जारी केली होती. मात्र टोरंट कंपनीने या नियमांचे पालन केले नाही. वितरकांना कमिशन वाढवून दिले नाही, असा आरोप पंप चालकांनी केला आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका पंप चालकांनी घेतली आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा आणि पुणे नगर महामार्गावर टोरंट कंपनीचे cng पंप सकाळपासून बंद करण्यात आलेत. मागच्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आज सकाळपासून पंप बंद करण्यात आल्याने याचा थेट परिणाम सामान्य वाहतुकीवर होताना पहायला मिळतोय.