योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 08 जानेवारी 2024 : देशात यंदा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक होतील. या निवडणुकांमध्ये कुणाला उमदवारी मिळणार? याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशात हडपसरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. हडपसरमधून शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, यावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. एक लक्षात ठेवा…लोकं आजही आपल्यासोबत आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप तुम्ही हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकता, असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे हडपसर विधानसभेचा उमेदवार जाहीर करून टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यातील हडपसरमध्ये मेळावा होत आहे. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. काल पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. इथे बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभेच्या उमेदवारीवर भाष्य केलं.
आपल्याला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील, असं काम करा. याही मतदारसंघात आपला उमेदवार निवडून येणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली कामं लोकांना सांगा. हडपसर मतदारसंघामधून हा मेळावा होतोय, असं म्हणत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं.
गेल्या काही दिवसात जे काही घडलंय हे आपणा सर्वांना माहित आहे. असो, आता नव्याने लढायला सुरूवात करतोय. गेल्या निवडणुकीत अवघ्या चेतन तुपे 2 हजार 700 मतांनी निवडून आले. तरीही ते तिकडे गेलेत. असो आता त्यांना भाजप कसं हे ते कळेल. आपण आता जोमाने कामाला लागायचंय. आपल्या लोकांची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असं जयंत पाटील म्हणाले.
हडपसर हा समाजवादी विचारांचा वारसा जपणारा भाग आहे. त्यामुळे निवडणुकीतही आपल्याला इथून चांगलं यश मिळू शकतं. महायुती सरकारच्या काळात सगळेच प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही?, असंही जयंत पाटील म्हणाले.