पुणे : पुण्यातील राजकीय घडामोडी थांबायचं काही नावच घेत नाहीय. पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि प्रचाराची मुदत संपल्यानंतरही घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी गंभीर आरोप केलाय. भाजपचे नेते आणि पदाधिकारी पोलिसांच्या समोर पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. या आरोपांवरुन त्यांनी आज उपोषण देखील केलं. त्यांच्या या आरोपांवरुन अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी ही पोटनिवडणूक थेट रद्द करण्याची मागणी केलीय.
अभिजीत बिचुकले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. “काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळी कसबा गणपतीसमोर आंदोलन केलं. मी ते आंदोलन सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून बघत होतो. ते म्हणत आहेत की, भाजपच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात आले. ते त्याचे व्हिडीओ दाखवत आहेत. या तक्रारीवर प्रशासन का काम करत नाहीय?”, असा सवाल बिचुकले यांनी केला.
“मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, निवडणूक आयोगाचे कॅमेरेमन मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कॅमेरेमन असतात. पण त्यांचे कॅमेरेमन मला दिसले नाहीत. इथले निवडणूक निर्णय अधिकारी हे राजकीय नेत्यांच्या साथीला आहेत असं समजावं?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपदेखील आक्रमक झालीय. भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धंगेकरांची तक्रार केलीय. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.
“काल पाच वाजता प्रचाराचा वेळ संपला. पण तरीही केवळ उपोषणाचा बनाव करुन एकप्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक अर्ज रद्द झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या शिष्टमंडळाने दिली. भाजप शिष्टमंडळाने याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेदेखील तक्रार केलीय. त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.