पुणे : पुण्यातील पोटनिवडणुका महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. सर्व पक्ष आपली पुर्ण ताकद लावताना दिसत आहेत. कसबा मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने आणि मविआकडून रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत. तर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आश्विनी जगताप आणि मविआकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मविआ या पोटनिवडणुकीची जागा मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. त्यामुळे भाजपनेही सर्व काही बदल केले आहेत. सुरूवातीला टिळक यांच्या घरातून नाराजीचे सूर उमटले होते. घरातच उमेदवारी द्यायला हवी असं शैलेश टिळक यांचं म्हणणं होतं. मात्र फडणवीसांच्या फोननं सारं काही आलबेल झालं आणि टिळक कुटंबीय भाजपच्या बैठकांना उपस्थित राहिलं. इतक्यावरच फडणवीस थांबले नाहीत कारण आता फडणवीसांनी आपल्या विश्वासातील नेत्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्याकडे फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या अनुभवाचा आणि ताकदीचा फडणवीस पुरेपूर फायदा या निवडणुकीमध्ये होईल. महापौर असताना मोहोळ यांनी आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला होता.
महापौरपदानंतर मोहोळ यांनी आपली कामे आणि जनसंपर्क वाढवला. आताच मोहोळ यांच्याकडे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मोहोळ यांनी जंगी आयोजन केलेलं अवघ्या राज्याने पाहिलं होतं. त्यामुळेच मोहोळ यांच्याकडे या निवडणूक प्रभारी म्हणून काम देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
काँग्रेसकडून कसबा मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अखेर रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपनेही वेगळी चाल केली ती म्हणजे टिळक यांच्या घरात उमेदवारी दिली नाही. हेमंत रासने यांना दांडगा उमेदवार भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी वाटप केलं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख आणि धीरज घाटे निवडणूक सह प्रमुख असणार आहेत. या निवडणुकीत धीरज घाटेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपनं त्यांना निवडणूक कार्यक्रमाची जबाबदारी दिली. चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय.