भाजपने कसब्याचा राग ब्राह्मण समाजावर काढला? अर्थसंकल्पातील तरतुदींवरून आनंद दवे भडकले…

| Updated on: Mar 10, 2023 | 11:01 AM

पुण्यात टीव्ही 9 शी बोलताना आनंद दवे म्हणाले, ' राज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे.

भाजपने कसब्याचा राग ब्राह्मण समाजावर काढला? अर्थसंकल्पातील तरतुदींवरून आनंद दवे भडकले...
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : कसब्याच्या  (Kasba) पोट निवडणुकीत (BY Election) ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली. भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा दारूण पराभव झाला. याचाच राग काढण्यासाठी भाजपने अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजावर अन्याय केला, असा आरोप हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केलाय. पुण्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी या भावना बोलून दाखवल्या. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प काल विधानसभेत सादर केला. सर्व जाती-जमातीतील नागरिकांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र ब्राह्मण समाजाच्या मागण्या अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आल्या नाहीत, असा आरोप हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी केलाय.

आनंद दवे यांचे आरोप काय?

पुण्यात टीव्ही ९ शी बोलताना आनंद दवे म्हणाले, ‘ राज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे. धनगर समाजाला 35,000 कोटी, भिडे स्मारकाला 50 कोटी, लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ : 50 कोटी,
गुरव समाजासाठी काशीबा गुरव विकास महामंडळ : 50 कोटी, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ :50 कोटी, वडार समाजासाठी मारुती चव्हाण महामंडळ : 50 कोटी दिले. पण ब्राह्मण समाजासाठी मात्र परशुराम विकास महामंडळ दिले नाही. याचं स्पष्टीकरण देताना अमृत योजना दिली, असं सांगण्यात आलं. अमृत योजना पण ती सर्वच खुल्या प्रवर्ग साठी आहे… त्यात सगळेच दावा सांगणार

इतर समाजांसाठी विरोध नाही पण…

इतर समाजाला शासन करत असलेल्या सहकार्यला आमचा विरोध नाही, त्याचे स्वागतच आहे. पण हे सर्वच समाज या आधी सुद्धा कोणत्या ना कोणत्या विकास महामंडळात लाभार्थी होतेच की ? मग वेगळं परशुराम महामंडळ का नाही ? मुळात असं सामाजिक विघटिकरण करण्यापेक्षा सर्वच जातींच्या गरजूसाठी एकच महामंडळ असावं या मताचे आम्ही आहोत, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे.

कसब्याचा राग?

भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघासाठी नुकतीच पोट निवडणूक झाली. या निवडणुकीत टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा इतर ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली, असा ब्राह्मण समाजाचा आग्रह होता. मात्र भाजपने हेमंत रासने यांना येथून तिकिट दिलं. त्यामुळे ब्राह्मण समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली. त्यामुळे ब्राह्मण समाजाची मतं फुटली. त्याचा फटका कसब्यात भाजपाला बसल्याचं म्हटलं जातंय. तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसब्यातील जनतेने कौल दिला. कसब्यात भाजपला ब्राह्मण समाजाची नाराजी भोवल्याचं म्हटलं जातंय. त्याचाच राग मनात धरून अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजावर अन्याय केलाय, असा आरोप आनंद दवे यांनी केलाय.