पुणे : लोणावळा येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या बैठकीत 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही, अशा प्रकारची नोटीस लोणावळा पोलिसांनी बजावली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Pune Lonavla Police notice to OBC Meeting)
लोणावळ्यात चिंतन बैठक
ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बैठकीला नोटीस बजावली आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे सर्व पक्षांचे नेते चिंतन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ओबीसी चिंतन बैठक सुरु होणार आहे. पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही ही चिंतन बैठक होणार असं आयोजकांपैकी एक ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांना सांगितलं.
भाजपचे जेलभरो, काँग्रेसचाही एल्गार
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून आज (शनिवारी) जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर काँग्रेसनेही आजच आणखी एका आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.
अहमदनगरमध्ये आक्रमक पवित्रा
दरम्यान, याआधी अहमदनगरमध्येही ओबीसी समाजाची चिंतन बैठक पार पडली होती. या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत ओबीसींच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तर ओबीसीं समाजामध्ये अनेक छोट्या छोट्या जाती आहे, त्यात मराठा समाज जर ओबीसी समाजात आला तर मोठा घात होणार आहे, असा आरोप बारा बलुतेदारी समाजाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण काळे यांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये अशी मागणी काळे यांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा काळे यांनी दिलाय.
संबंधित बातम्या :
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, तर केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार
(Pune Lonavla Police notice to OBC Meeting)