पुणे : पुणे जिल्ह्यात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धा पसरवला जात असल्याचा आरोप आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ कुठल्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही. (Pune Maval Gram Panchayat Superstition)
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामधील टाकवे गावात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा होत असल्याचा दावा केला जात आहे. 16 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड होणार आहे. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा केला जात असल्याचं बोललं जातं.
टाकवे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहिण्यात आली. खिळे मारलेली तीन लिंबं इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून खिळे मारत भीती पसरवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
हनुमंताला पाणी सोडून शपथ घेण्याचा व्हिडीओ
जामनेरमधील महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत सदस्यांना हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्यायला लावल्याचा व्हायरल व्हिडीओ समोर आला होता. जळगावात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात फोडाफोडी होण्याच्या भीतीने महाविकास आघाडीने सदस्यांना शपथ घ्यायला लावल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गिरीश महाजन यांना मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करता आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज रंगली आहे.
ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊ नयेत, यासाठी हरतऱ्हेची खबरदारी घेतली जाते. कधी सदस्यांना सहलीवर नेले जाते, तर कधी रिसॉर्टमध्ये ठेवले जाते. मात्र जामनेरमध्ये अनोखा प्रकार घडल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये समोर आलं होतं.
मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांना महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी हनुमंताजवळ शपथ घ्यायला लावल्याची चर्चा आहे. मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, मी एकनिष्ठ राहीन, अशी हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्यायला लावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
संबंधित बातम्या :
(Pune Maval Gram Panchayat Superstition)