सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच बसायचं का?; अजितदादांचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Oct 05, 2024 | 10:09 AM

Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच बसायचं का?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे. विधानसभा निवडणूक कधी होणार? यावरही अजित पवार बोललेत. वाचा सविस्तर...

सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच बसायचं का?; अजितदादांचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल
शरद पवार, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं? असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केल आहे. पुण्यातील मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

मागच्या वर्षी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मावळमध्ये बोलताना शरद पवारांपासून दूर होण्याचं कारणही अजित पवारांनी सांगितलं. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, शरद पवारांना उद्देशून असं विधान अजित पवारांनी केलं.

येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईलय 35 दिवसांनी मतदान होईल, असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.

सुनील शेळकेंचे कान टोचले

अजित पवारांचा स्वभाव सर्वश्रुत आहे. एखाद्यानं त्यांच्यासमोर वाढीवपणा केला तर त्याची खैर नसते. याची प्रचिती पुण्याच्या मावळ विधानसभेत आली. विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मावळवासीयांवर दहशत निर्माण केली, तर लक्षात ठेवावं…. प्रत्येकजण मरायलाचं आलेला आहे, अशा शब्दात मावळचे आमदार सुनील शेळकेंनी मतदारसंघातील इतर इच्छुक उमेदवारांना असा इशारा थेट दिला. यावेळी अजित पवारही मंचावर होते. मग अजित पवारांनीही सर्वांसमोर आमदार शेळकेंचे कान टोचले. आज सुनीलची गाडी जरा जास्तचं गरम होती. पण जरा सबुरीने घ्यायचं असतं, आपल्याला सर्वांची गरज असते. उगीचं काहीही बोलून साध्य होत नसतं, अशा शब्दात अजित पवारांनी सुनील शेळके यांचे कान टोचले.