पुणे : राज्य सरकारनं सोमवारी राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये दुजाभाव का? असा सवाल करत पुण्याबाबत पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात, असा हल्लाबोल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol यांनी राज्य सरकारवर केला आहे.
पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं तर मुख्यमंत्री तिसरच, महापौरांचा हल्लाबोल
कोरोनाचे नियम शिथिल करण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. पुण्यातले निर्बंध हटवण्याबाबत पालकमंत्री एक वक्तव्य करतात, आरोग्यमंत्री दुसरं काहीतरी बोलतात आणि मुख्यमंत्री वेगळीच भूमिका मांडतात, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.
पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का?
राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. या सर्व नियमांमध्ये पुणे बसत असताना पुण्यासोबत दुजाभाव का? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
पुण्याच्या बाबतीत राजकारण होतंय
राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. शिवाय संक्रमणाचा दरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहे. अधिक सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या जिल्ह्यांच्या समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध हटवण्यावरून राज्य सरकार पुण्याच्या बाबतीत राजकारण करत असल्याचा आरोपही मोहोळ यांनी केला आहे.
दरम्यान, कोरोनानिर्बंधांवरून गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातले व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारनं पुण्यातले निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध हटवण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातले निर्बंधही हटवले जातील, अशी या व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र,निर्बंध कायम राहिल्याने व्यापारी अधिकच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या :
Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच; महापौर नाराज, व्यापारी आक्रमक